Site icon Aapli Baramati News

धक्कादायक : बाबासाहेबांचं गाणं लावलं म्हणून दलित कुटुंबांला मारहाण..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

हळदी समारंभामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाणी लावली म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील  तालुका पुसद तेथील सरपंचने व त्यांच्या सहकाऱ्यांनी दलित कुटुंबातील (होलार समाजातील) लोकांना जातिवाचक शिवीगाळ करून कुटुंबांना काठीने बेदम मारहाण केली आहे. दरम्यान याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहे. संबंधित जातीवाद्यांना तात्काळ अटक करुन कडक शिक्षा करावी अशी मागणी बारामती शहर व तालुका होलार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

दलित मागासवर्गीय समाजातील होलार समाजाच्या  प्रकाश ताळीकुटे यांच्या घरी (दि: २४) जुलै रोजी त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम होता. सदर कार्यक्रमात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाणी लावली होती.  त्यावरून सरपंच रमेश राठोड यांनी गावगुंडांना गोळा करून ताळीकुटे कुटुंबीयांना शिवीगाळ करत दांडक्यानी बेदम मारहाण केली. यामध्ये अनेकजण जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.  याप्रकरणी सरपंच रमेश राठोड व त्याच्या साथीदारांवर पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटी अॅक्टसह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल आहे. मात्र अद्याप अटक झालेली नाही.

घटनेचा निषेध करत आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर शिक्षा व्हावी यासाठी बारामती शहर व तालुका होलार समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी,  उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच बारामती शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.  आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर शिक्षा करावी, अन्यथा होलार समाज महाराष्ट्रभर तीव्र व उग्र स्वरूपात आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी होलार समाजाचे ज्येष्ठ नेते बाळासो देवकाते, बळवंत माने, बाळासाहेब जाधव, भारत देवकाते, सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती गोरे, गोरख पारसे, सेवक अहिवळे, अक्षय माने,रोहीदास गोरे, लखन कोटगर, पत्रकार सुरज देवकाते यांच्यासह होलार समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version