Site icon Aapli Baramati News

Sharad Pawar Birthday : पवारसाहेबांबद्दल बोलताना अजितदादा झाले भावुक..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कडक स्वभावाचे आणि शिस्तप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. मात्र अजितदादा जितके कडक आहेत तितकेच हळवेही आहेत हे अनेकदा पहायला मिळालंय.. आज मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. यावेळी पवारसाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अजितदादांना दाटून आलं.. नेहमीच आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी करणारे अजितदादा आज मात्र भावनिक झाले. 

मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला शरद पवार, प्रतिभा पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे,  गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. शरद पवार यांनी संधी दिल्यामुळे आज राज्यात आमच्यासह असंख्य कार्यकर्ते कार्यरत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. साहेबांच्यामुळे आज राजकारणात अनेकजण उभे राहिले, त्यांचं योगदान विसरता न येणारं असल्याचं सांगताना अजितदादा भावनिक झाले. 

पवारसाहेबांची नोंद घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाणार नाही असे सांगून अजित पवार म्हणाले, पवरसाहेबांनी आमच्यावर बारकाईने लक्ष देतानाच संस्कार, ताकद आणि बळही दिले. माझ्या आजवरच्या राजकीय, सामाजिक जडणघडणीमध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. साहेबांचं आजवरचा प्रवास ही मोठी आख्यायिका असल्याचेही अजित पवार यांनी नमूद केले.

साहेबांबद्दल काय बोलावं हे मला सुचत नसल्याची कबुली देत भावुक झालेल्या अजितदादांनी आपल्या भाषणाची सांगता केली. एकूणच अजितदादा हे स्वभावाने कडक असल्याचे बोलले जाते. मात्र ते तितकेच हळवे आहेत हे अनेकदा पहायला मिळाले आहे. आजही अजितदादांच्या हळव्या स्वभावाची प्रचिती अवघ्या महाराष्ट्राला आली.      


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version