बारामती : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात बारामती तालुका आघाडीवर आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी कोरोनाला रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबत तातडीने बैठक घेऊन पुढील सात दिवसांसाठी तालुक्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होणार आहे. त्यामध्ये किराणा दुकाने आणि भाजी मंडई देखील बंद ठेवणयाचे निर्देश देण्यात आले आहेत. दूध आणि वर्तमानपत्र वितरणासाठी मात्र यामध्ये मुभा देण्यात आली आहे सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत दूध वितरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी पोलीस यंत्रणेने जास्तीचा सहभाग घ्यावा, अशा सूचना प्रांत अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत राबविण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊन मध्ये म्हणावा तसा परिणाम जाणवला नाही. बारामतीत दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.
काय सुरू राहणार..? : रुग्णालये, औषध दुकाने, बँका (केवळ कर्मचाऱ्यांसाठी), एमआयडीसीतील प्रक्रिया करणारे व निर्यातक्षम उत्पादन घेणारे उद्योग..
काय आहे नियम : दवाखान्यात जाताना चिठ्ठी, अपॉईंटमेट आवश्यक, रुग्णांना डबा देणारांसाठी तसेच नातेवाईकांसाठी संबंधित रुग्णालयाची सही शिक्का असलेली चिठ्ठी, विनाकारण फिरल्यास पोलिस यंत्रणेकडून कठोर कारवाई
पोलिस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त
बारामतीत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे. एक उपविभागीय पोलिस अधिकारी, बारा पोलिस अधिकारी, १२० कर्मचारी, राज्य राखीव दल व ४० होमगार्ड असा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.