बारामती : प्रतिनिधी
राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी होवूनही बारामतीतील रुग्णसंख्या कमी होत नाही. त्यामुळे आता बारामतीत कडक निर्बंध लागू करत लॉकडाऊन करण्याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा आशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या (दि. ३ मे) महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.
आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढत्या रुग्णसंख्येबद्दल माहिती घेतली. राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करूनही बारामतीतील रुग्णसंख्या कमी होत नाही ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मागील वर्षाप्रमानेच बारामतीत पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
बारामतीमध्ये प्रशासनाकडून मागील वर्षी ‘बारामती पॅटर्न’ हा अभिनव उपक्रम हाती घेत कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली होती. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करत हव्या त्या वस्तू घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे बारामतीतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा बारामतीत सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनची रूपरेषा ठरवली जाणार असून त्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेतले जाणार आहेत.