पुणे : आपली बारामती
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वभावाचे विविध पैलू वेगवेगळ्या निमित्तानं पहायला मिळतात.. व्यक्तशीर, कामाप्रती आपुलकी जपणारे आणि स्पष्टवक्ते अशी अजितदादांची ख्याती आहे.. प्रसिद्धीपासून दूर राहत अधिकाधिक वेळ कामासाठी देत सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यावर अजितदादांचा भर असतो.. नियमीतपणे कामात व्यस्त असणारे अजितदादा सर्वांनीच अनुभवले आहेत.. मात्र आज पुण्यात त्यांच्या स्वभावाचा एक वेगळा पैलू पहायला मिळाला तो संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना.. त्यांनी हा प्रसंग स्वत:च शब्दबद्ध करीत दादांच्या कामाबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
आपल्या पोस्टमध्ये प्रवीण गायकवाड म्हणतात, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांची मी कौन्सिल हॉल, पुणे येथे सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो असता सर्व प्रथम ‘जय जिजाऊ प्रविणजी,’ असे ते म्हणाले. पहिल्यापासून जिजाऊ-शिवरायांना प्रेरणा मानणारे अजितदादा मी कित्येक वर्षे पाहत आलोय. या वेळी SM Creativity यांनी तयार केलेली ‘जिजाऊ शिवबा’ यांची शिवनेरी येथे असणारी प्रतिकृती व शिवाजी महाराजांचा जिरेटोप – कवड्याची माळ अशा दोन कलाकृती मी त्यांना भेट दिल्या. क्षणात अजितदादा उठून उभे राहिले अन् भावूक होऊन नतमस्तक झाले. आपसुकच तिथे उपस्थितीत असणारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, एस पी व आयुक्त सर्वांनी ‘जिजाऊ-शिवबा’ यांना वंदन केलं.
यातून अजितदादांची जिजाऊ – शिवरायांबद्दलची श्रद्धा दिसते आणि याच श्रद्धेपोटी त्यांनी केलेली शिवनेरी किल्ल्यावरील विकासकामे आठवतात. चर्चा होत असताना अजितदादांनी त्या कामासंबंधी काही जुन्या आठवणी सांगितल्या. किल्ले शिवनेरी येथे गेले १५-२० वर्षांपासून होणारा विकास खरंच अफलातून आहे. या विकासकामात प्रभाकर देशमुख यांनी सहकार्याची भूमिका बजावली. विकासकामे झाल्यामुळे शिवनेरी गडावरील पर्यटन तर वाढलेच अन् त्यामुळे तेथील स्थानिक लोकांनाही त्याचा फायदा झाला. या विकासकामाचे व २००० सालापासून किल्ल्यावर १९ फेब्रुवारी रोजी दर वर्षी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीचे क्रेडिट अजितदादांचेच आहे.
कोरोनाच्या काळात देखील पहाटे ७ ते रात्री ११ पर्यंत अहोरात्र काम करणारे अजितदादा आपण सगळे पाहतोच आहे. मला हा प्रसंग व्यक्तिश: खूप महत्वाचा व भावनिक वाटतो कारण प्रत्यक्ष सतत कामात व्यस्त राहणारे, विकासाचे राजकारण करणारे कुशल नेते अजितदादा हे शिवराय – फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचारांचे आहेत हे स्पष्टपणे दिसून येते. महाराष्ट्रातील लोकांकरिता ते कायम न्यायी भूमिका घेत असतात. शेवटी एवढंच म्हणेल की शिवरायांच्या पुण्यतिथीच्या एक दिवस अगोदर होणारी ही आमची भेट कायम अविस्मरणीय राहिल…!