Site icon Aapli Baramati News

SAD INCIDENT : अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी; लग्नानंतर सहाव्या दिवशी नवरदेवाचं निधन

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी  

विवाह हा दोन कुटुंबांना जोडणारा आणि दोन जीवांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणारा प्रसंग असतो. यात वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये एक वेगळा आनंद पाहायला मिळतो. मात्र विवाहानंतर अवघ्या सहाव्या दिवशी नवरदेवाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना बारामती तालुक्यातील माळेगाव येथे घडली. या घटनेमुळे माळेगावसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

याबाबत माहिती अशी की, माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील कर्मचारी अनिल येळे यांचे पुत्र सचिन उर्फ बबलु येळे याचा परभणी जिल्ह्यातील पिंपळा येथील हर्षदा संतोबा बोरकर हिच्याशी दि. १९ नोव्हेंबर रोजी विवाह संपन्न झाला. शारदानगर येथील अनुज गार्डन येथे अतिशय आनंदी वातावरणात विवाह सोहळा पार पडल्यानंतर येळे कुटुंबीयांनी परंपरेनुसार देवदर्शन आणि इतर विधीही पूर्ण केले.

नव्याने लग्न झालेले वधू-वर आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत नवीन जीवनाला सुरुवात होत असल्याने आनंदी होते. मात्र गुरुवारी पहाटे सचिन उर्फ बबलू याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला तात्काळ बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सचिनची हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे प्राणज्योत मालवली. लग्नामुळे आनंदात असलेल्या या कुटुंबीयांवर दु:खाचा अक्षरश: डोंगर कोसळला.

लग्न होवून अवघे सहा दिवसच झालेले असताना येळे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. ज्या मांडवातून लग्नाची वरात निघाली, त्याच मांडवात सचिनचा मृतदेह ठेवण्याची नामुष्की कुटुंबीयांवर ओढवली. दुसरीकडे आपली पतीसमवेत सुखी आयुष्याची स्वप्ने रंगवणाऱ्या हर्षदालाही या घटनेने मानसिक धक्का बसला आहे.

आज अतिशय शोकाकुल वातावरणात सचिनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिन याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version