बारामती : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेतेशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल २२ वर्षे निलंगा ते काटेवाडी हे तब्बल ३१० किमी अंतर सायकलवरुन पार करणारे गनीभाई खडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पवारसाहेबांवरील प्रेमापोटी सायकलवरून निलंगा ते काटेवाडी आणि पुन्हा निलंगा असा प्रवास करणारा या अवलियाच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
६६ वर्षीय अब्दुल गनी खडके हे गेल्या २२ वर्षांपासून निलंगा येथून सायकलवरुन येवून काटेवाडीत १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. २२ वर्षे कधीही खंड न पडू देता त्यांनी आपले शरद पवार यांच्यावर असलेले प्रेम व्यक्त केले होते. दोन वर्षांपूर्वी ते बारामतीत आल्यानंतर त्यांना शरद पवार यांनी थांबवून ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांना गोविंद बागेत बोलावून घेत त्यांच्याशी संवाद साधला होता. ही त्यांची पहिली आणि शेवटची भेट ठरली.
कोरोना काळात त्यांना बारामतीत येता न आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. बारामतीसह परिसरात त्यांनी ‘गनीमामू’ म्हणून नावलौकीक मिळवला होता. डिसेंबर महिना आला की त्यांच्या आगमनाचे वेध कार्यकर्त्यांना लागायचे. अनेकजण या ना त्या मार्गाने त्यांना मदतही करत होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याने कार्यकर्त्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.