Site icon Aapli Baramati News

BREAKING NEWS : पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती तालुक्यातील वाळू माफियांना दिला दणका; ४७ लाखांचा ऐवज केला जप्त

ह्याचा प्रसार करा

सुपे : प्रतिनिधी

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी परिसरात कऱ्हा नदीपात्रात सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर धडक कारवाई केली आहे. यामध्ये वाळूसह जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रक अशी सात वाहने असा तब्बल ४७ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नऊ जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोहर शामराव चांदगुडे (वय ४६, रा.धरणवस्ती,चांदगुडेवाडी ता.बारामती), स्वप्नील ज्ञानेश्वर भोंडवे (वय २७), विठठल तानाजी जाधव (वय २५, दोघे रा.आंबी खु।। ता.बारामती), अमोल शंकर सणस (वय ४६, रा. उरूळीकांचन ता.हवेली), महादेव बाळु ढोले (वय ३८ रा. मोरगाव, ता.बारामती), विकास बाबासो चांदगुडे ( वय ३५, रा.चांदगुडेवाडी, ता.बारामती आणि तीन अनोळखी इसम (नाव पत्ता माहित नाही) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, चांदगुडेवाडी परिसरात कऱ्हा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पोलिसांच्या पथकाने नदीपात्रात धडक कारवाई केली. त्यामध्ये जेसीबी, ट्रॅक्टर, डंपिंग ट्रॉलीसह मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच यातील काहीजण फरार झाले.

दरम्यान, घटनास्थळी मनोहर चांदगुडे, स्वप्नील भोंडवे, विठठल जाधव, अमोल सणस, महादेव ढोले, विकास चांदगुडे यांना ताब्यात घेतले आहे. तर घटनास्थळावरून तीन ट्रक्टर ट्रॉली, दोन जेसीबी व एका ट्रकसह वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. पोलीस या कारवाईत सातत्य ठेवणार का याकडे आता लक्ष लागले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version