Site icon Aapli Baramati News

अभिमानास्पद.. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमधील १६ विद्यार्थी एकाच वेळी झाले ‘पीएसआय’

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील तब्बल १६ विद्यार्थ्यांनी पोलिस उपनिरीक्षक या पदाला गवसणी घातली आहे. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ही नेत्रदीपक कामगिरी करून या विद्यार्थ्यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे.

संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार यांच्या सूचनेवरून ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी पोलिस अधिकारी व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या प्राजक्ता घुले, कल्याणी जावळे, प्रतीक्षा वनवे, अश्विनी कदम, दिपाली धालपे, संजय कोकरे, दत्तात्रेय बाराते, शैलेश मोरे, अशोक नरोटे, निलेश ओमासे, पृथ्वी बाराते, मनोज कदम, मनोज आळंद, शंकर पाटील, शुभम शिंदे, दीपक लोणकर अशा तब्बल १६ विद्यार्थ्यांनी राज्य सेवा परीक्षेत यश मिळवत एकाचवेळी पोलिस उपनिरीक्षकपदाची संधी मिळवली असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या काळात कठोर परिश्रम घेतले. त्यामुळेच त्यांना हे आवाहन पेलता आले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. सुनिल ओगले यांनी लॉकडाऊन असतानाही त्यांची संपूर्ण तयारी करून घेतली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महामारीच्या काळात ग्रंथालयातील वाचनकक्ष, संस्थेचे भव्य असे क्रिडांगण उपलब्ध करून दिले. तसेच त्यांना वर्षंभर योग्य मार्गदर्शन केले, तज्ञ व्यक्ती कडून आभासी मुलाखतीही घेतल्या.

मंगळवेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे, प्रा. डॉ. विलास बुवा, प्रा. डॉ. संजय खिलारे, प्रा. डॉ. सुनिल ओगले व डॉ. भरत शिंदे यांनीही या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीमध्ये सहभाग घेतला. लॉकडाऊन असूनही ग्रामीण भागातील गरीब घरातील विद्यार्थ्यांनी घेतलेली कठोर मेहनत आणि या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शिक्षकांनी केलेले योग्य मार्गदर्शन हेच या यशाचे गमक असल्याची प्रतिक्रिया संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार यांनी व्यक्त करत यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

प्राचार्य डॉ. भरत शिंदे, डॉ सुनील ओगले, उपप्राचार्य अंकुश खोत, डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. शामराव घाडगे, प्रा. निलिमा पेंढारकर व इतर प्राध्यापकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version