Site icon Aapli Baramati News

POLITICAL NEWS : अजितदादांचं पत्रकारांना मिश्किल उत्तर; म्हणाले, त्यांना वाटलं असेल तू माझ्यावर हल्ला करणार आहेस, म्हणून…

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

अजितदादा हे आपल्या मिश्किल आणि दिलखुलास स्वभावासाठी ओळखले जातात.. आपल्या खास शैलीत भाषण करून उपस्थितांमध्ये हशा पिकवणारे अजितदादा कधी कधी पत्रकारांचीही फिरकी घेताना दिसतात. आज बारामती दौऱ्यावर असलेल्या अजितदादांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली. यावरून प्रश्न विचारल्यानंतर पोलिसांना वाटलं असेल, तू माझ्यावर हल्ला करणार आहेस म्हणून सुरक्षा वाढवली काय असा मिश्किल टोमणा मारत अजितदादांनी पत्रकारांची फिरकी घेत उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

बारामतीत आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा दौरा होता. पहाटे सहा वाजल्यापासून अजितदादांनी शहर आणि परिसरातील विविध विकासकामांना भेटी देत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी बारामतीत आयोजित महाराष्ट्र ऑलिंपिक कबड्डी स्पर्धेस हजेरी लावली. नेहमीप्रमाणे विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात अजितदादांचा जनता दरबारही पार पडला. आजच्या दौऱ्यादरम्यान पोलिस यंत्रणेकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी केली जात होती.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी सुरक्षेत वाढ झाल्याबद्दल अजितदादांकडे विचारणा केली. त्यावर अजितदादांनी आपल्या खास स्टाईलमध्ये उत्तर दिले. सुरक्षेत का वाढ झाली याबद्दल मला माहिती नाही, तुम्हीच पोलिसांना विचारा असं अजितदादा म्हणाले. याबद्दल माहिती दिली जात नाही अशी तक्रार पत्रकारांकडून करण्यात आली. यावर बोलताना अजितदादांनी त्यांना असं वाटलं असेल की तू माझ्यावर हल्ला करणार आहेस, म्हणून वाढ केली का काय मला माहिती नाही असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

मी बारामतीचा आहे, बारामती माझी आहे.. मी इथे येणार, लोकांसोबत मिसळून काम करणार. पोलिसांना काहीतरी माहिती मिळाली असेल म्हणून त्यांनी खबरदारी घेतली असावी. शेवटी आपल्या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलिस यंत्रणेची आहे. त्यामुळे ते जबाबदारी पार पाडतील, आपणही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version