पुणे : प्रतिनिधी
राज्यात अग्रगण्य असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आज बारामती तालुका ‘अ’ वर्ग मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवार यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्ता भरणे, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह काँग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हा बँक निवडणूक कार्यालयामध्ये अजित पवार यांच्या वतीने संचालकपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. एका उमेदवारी अर्जावर अमोल गावडे यांनी सूचक म्हणून, तर लालासाहेब नलवडे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. तर दुसऱ्या उमेदवारी अर्जावर सतीश तावरे यांनी सूचक आणि दिपक मलगुंडे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. अर्ज दाखल करताना ज्येष्ठ किरण गुजर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, नगरसेवक सुधीर पानसरे हे उपस्थित होते.
जिल्हा बँकेपासून अजित पवार यांच्या राजकारणाची सुरुवात झालेली आहे. त्यांनी १९९१ मध्ये जिल्हा बँकेच्या संचालकपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. अजित पवार यांनी आत्तापर्यंत सातवेळा या बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे. या निवडणुकीतही अजित पवार यांच्या संमतीनेच उमेदवारांची नावे निश्चित होणार आहेत. त्यामुळे आता कोणाला संधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.