बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील जळोची येथील स्मशानभूमीच्या मागील बाजूस एक अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. अभिजीत विजय खरात (वय ३५, रा. अंथुर्णे, ता. इंदापूर, सध्या रा. श्रीरामनगर, बारामती) असे या मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
याबाबत माहिती अशी की, बारामती शहरातील जळोची येथील स्मशानभूमीच्या मागील बाजूस आज सकाळी एक अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढळला. बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक माहिती घेतली असता अभिजीत विजय खरात असे त्याचे नाव असल्याचे निष्पन्न झाले.
खरात हे एका औषधांच्या दुकानात काम करत होते. काल रात्री उशीरा त्यांनी स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले असून ही आत्महत्या की खून याबद्दल शंका कुशंका उपस्थित होत आहेत. संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतरच याबद्दलचे सत्य समोर येणार आहे. अधिक तपास बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक करीत आहेत.