बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या नटराज नाट्य कला मंडळाच्या कलादालनाचे गुरुवार दि. १ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षनेते अजित पवार व बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने बारामती गणेश फेस्टिव्हलचाही शुभारंभ होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली.
बारामतीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह नाट्यसंमेलन, नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा यासह सांस्कृतिक चळवळ जपण्यासाठी नटराज नाट्य कला मंडळाने पुढाकार घेतला आहे. आता नव्याने उभारलेल्या दिमाखदार इमारतीत या कलामंडळाचे काम सुरू होत आहे. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता विरोधी पक्षनेते अजित पवार आणि बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते कालदालनाचे उदघाटन होणार आहे. त्याचवेळी बारामती गणेश फेस्टिव्हलचीही सुरुवात होणार आहे.
या फेस्टिव्हलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी बारामतीकरांना मिळणार आहे. गुरुवारी अभिनेते भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेले मोरूची मावशी हे नाटक, शुक्रवार दि. २ रोजी मराठी हिंदी गाण्यांचा सप्तसुरांचा इंद्रधनू हा कार्यक्रम, शनिवारी मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रा, रविवारी निवृत्तीमहाराज देशमुख यांचे किर्तन, सोमवार दि. ५ रोजी लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा लतायुग हा कार्यक्रम, मंगळवारी आशिकी हा मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम, बुधवारी ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम, गुरुवारी दि. ८ रोजी दुपारी ४ वाजता स्थानिक कलावंतांचा कऱ्हेचे कलावंत हा कार्यक्रम आणि सायंकाळी ७ वाजता लख लख चंदेरी हा मराठी लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे.