बारामती : प्रतिनिधी
फुकट अंडी न दिल्याच्या कारणावरून अंडा भुर्जी विक्रेत्याला बेदम मारहाण करण्याचा प्रकार बारामती शहरात घडला होता. या विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित विक्रेत्याला मारहाण करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
शाहबाज रौफ पठाण (वय ३२, रा. सदगुरूनगर, पाटस रोड, बारामती) असे या घटनेतील मृत अंडा भुर्जी विक्रेत्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील टीसी कॉलेज रस्त्यावर शाहबाज हा अंडा-भुर्जी विक्रीचा व्यवसाय करत होता. दि. ३० सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी एका अज्ञात इसमाने त्याच्या गाड्यावर येवून अंडी व अन्य पदार्थ घेतले. त्यानंतर शाहबाजने या इसमाला पैशांची मागणी केली.
पैसे का मागितले या कारणावरून या इसमाने शाहबाजला बेदम मारहाण केली. यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्यावर बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु रविवार दि. ८ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी आरोपीच्या शोधासाठी तात्काळ चार पथके नेमली.
गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार दशरथ इंगोले व अक्षय सिताप यांनी तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व अन्य माहितीच्या आधारे एकाने मृत शाहबाज याच्याशी वाद घातल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार तपास केल्यानंतर प्रवीण भानुदास मोरे (वय ३६, रा. कल्याणीनगर, तांदूळवाडी) याला ताब्यात घेण्यात आले. या आरोपीकडे अधिक विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार रामचंद्र शिंदे, अभिजित कांबळे, दशरथ इंगोले, अक्षय सीताप, दादा जाधव, सागर जामदार, शाहू राणे यांनी या गुन्ह्याची उकल करत आरोपीला जेरबंद केले.