बारामती : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच केले असतानाच राज्य शासनाने आज पहाटेच नवीन अध्यादेश काढत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असून बारामतीत रविवार दि. २८ जानेवारी रोजी विजय उत्सव मिरवणूक काढण्यात येणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी आंतरवाली सराटीतून पायी दिंडी सुरू केली होती. काल वाशीत मराठ्यांचं वादळ दाखल झाल्यानंतर राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर रात्री पुन्हा या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्या चर्चा करत मराठा आरक्षणाबाबत नवीन अध्यादेश सुपूर्द केला. त्यानंतर राज्यभरात एकच जल्लोष सुरू झाला आहे.
मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी बारामती शहरात उद्या रविवार दि. २८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता भव्य विजय उत्सव मिरवणूक काढण्यात येणार आहे. बारामती शहरातील कसबा येथील छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानापासून या मिरावणुकीला सुरुवात केली जाणार आहे. ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून जाणार असून यात मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.