बारामती : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या मागण्या ४० दिवसांनंतरही पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे आता जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत आंदोलन सुरू केलं आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी बारामतीतही साखळी अन्नत्याग आंदोलन केलं जाणार आहे. रविवार दि. २९ ऑक्टोबरपासून बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत आंदोलन सुरू केलं होतं. या दरम्यान, आंदोलनस्थळी पोलिसांकडून लाठीहल्ला झाला. त्यामुळे या आंदोलनाचे लोन संपूर्ण महाराष्ट्रात पसरले. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरवालीत जाऊन जरांगे पाटील यांना ४० दिवसांत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं.
दरम्यानच्या काळात जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा करत सरकारकडे मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली होती. शासनाकडून दिलेल्या मुदतीनंतरही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवालीत पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बारामतीतही साखळी अन्नत्याग आंदोलन केलं जाणार आहे. रविवार दि. २९ ऑक्टोबरपासून बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर हे आंदोलन होणार आहे.
रविवारी या आंदोलनात बारामती शहर आणि तालुक्यातील मराठा समाजाचे बांधव सहभाग घेणार आहेत. त्यानंतर दि. ३० ऑक्टोबर रोजी खांडज, मळद, पाहुणेवाडी, निरावागज, घाडगेवाडी या गावात आणि दि. ३१ ऑक्टोबर रोजी सांगवी, शिरवली, कांबळेश्वर, लाटे, शिरष्णे, बजरंगवाडी आणि १ नोव्हेंबर रोजी माळेगाव बुद्रुक, माळेगाव खुर्द, पणदरे, ढाकाळे आणि सोनकसवाडी येथे हे आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.