बारामती : प्रतिनिधी
बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला महाविकास आघाडी सरकारने खास भेट दिली आहे. जपानहून मागवण्यात आलेले ‘१२८ स्लाईस सी टी स्कॅन’ हे मशीन महाविद्यालयात दाखल झाले असून लवकरच ते कार्यान्वित केले जाणार आहे. त्यामुळे बारामतीसह परिसरातील गरजू रुग्णांसाठी सीटी स्कॅनची सोय उपलब्ध होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून बारामतीत वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी झाली आहे. या महाविद्यालयाला जोडूनच रुग्णालयही सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालय आणि रुग्णालयात अधिकाधिक चांगल्या सोईसुविधांसह अत्याधुनिक यंत्रणाही उपलब्ध केल्या जात आहेत. मागील काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या महाविद्यालयात अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीन उपलब्ध करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार हे मशीन उपलब्ध झाले आहे.
सुमारे ७ कोटी रुपयांचे हे मशीन असून मेंदू, मणका व पोटाच्या विविध विकारांची तपासणी करण्यासाठी या मशीनचा वापर करण्यात येणार आहे. रुग्णाचे अचूक रोगनिदान करुन त्यावर आणखी प्रभावी औषधोपचार करणे या मशीनमुळे शक्य होणार आहे. ही मशीन लवकरच कार्यान्वित केली जाणार असून अतिशय माफक दरात ती आपल्या सेवेत रुजू होणार आहे. त्यामुळे बारामतीसह परिसरातील रुग्णांची सोय होणार असून या सुविधेमुळे येथील आरोग्यव्यवस्था आणखी सक्षम होण्यास मदत होणार आहे.