Site icon Aapli Baramati News

बारामतीतील महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करणारे गजाआड; बारामती तालुका पोलिसांची कामगिरी

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील एका महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करून त्याला माळशेज घाटात फेकून दिल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पाच जणांना बारामती तालुका पोलिसांनी करमाळा तालुक्यातून अटक केली आहे. याबाबत नितीन कदम यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन हा बारामतीतील महाविद्यालयात शिकत आहे. त्याने त्याच्याकडील गाडी बंडू मुळे याला विकली. मुळे याने त्याला पैसे दिले नाही. त्यामुळे नितीन टी.टी. फॉर्मवर सही करत नव्हता. तो २१ मार्च रोजी जिममध्ये व्यायाम करत होता. तेव्हा तिथे बंडू मुळे आणि त्याच्या साथीदारासोबत आला.

खोटे कारण देऊन त्याला गाडीत बसवून करमाळा रस्त्यावर त्याच्याकडे मोबाईल काढून घेत बळजबरीने फॉर्मवर सही करण्यास भाग पाडले.  त्यांना प्रतिकार करताच त्याच्या डोक्यात लोखंडी टॉमिने वार केला. मुळे आणि त्याच्या साथीदाराला तो मृत पावला असे वाटले.त्यामुळे त्याला माळशेज घाटात फेकून दिले. त्यानंतर तो स्थानिकांची मदत घेत बारामतीत पोहोचला.

या प्रकरणी तालुका पोलिसांनी करमाळा तालुक्यातून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. अविष्कार दळवी, बालाजी जाधव, आदनान देशमुख, रत्नदीप पुजारी आणि दत्ता सपाटे (सर्व रा. करमाळा) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तालुका पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार राम कानगुडे, पोलीस नाईक रणजीत मुळीक, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, नितीन कांबळे, महेश कळसाईत, अमोल नरुटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version