Site icon Aapli Baramati News

पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांचे तात्काळ फायर ऑडिट करा : विभागीय आयुक्त सौरभ राव

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

विरार येथील रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. सध्याच्या कोरोना काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हे आदेश देण्यात आले असून त्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

विरार येथील रुग्णालयात भीषण आग लागली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होवून जीवितहानीही झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेनंतर सर्वच रुग्णालयांनी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील शासकीय, खासगी रुग्णालयांचे तात्काळ फायर ऑडिट करून त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी स्वतंत्र पथकांची निर्मिती करून त्यामध्ये बांधकाम विभाग, विद्युत विभाग, अग्निशमन विभाग, नियोजन विभाग आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील बेड वाढवले जात आहेत. त्यामुळे विद्युत यंत्रणेसह अग्निशमन यंत्रणेवरील भार वाढत असल्याने  शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारणांमुळे आगीच्या घटना घडू शकतात.  त्यासाठी सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे ऑडिट होणे आवश्यक असल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.   


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version