शेतकरी व सामान्य जनतेला त्रास होणार नाही हीच भुमिका : अजित पवार
बारामती : प्रतिनिधी
आजपर्यंत बारामतीकरांनी निर्विवादपणे आम्हाला साथ दिली आहे. सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या हिताविरोधात आपली कधीही भुमिका राहिलेली नाही. त्यामुळे बारामतीत जिथे विरोध असेल तिथे निरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण होणार नाही अशी ग्वाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
बारामती तालुक्यातील निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. त्यामुळे अस्तरीकरणाला विरोध आणि पाठींबा अशा दोन भुमिका घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज बारामती दौऱ्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.
आजपर्यंत बारामतीकरांनी नेहमीच आपल्याला पाठबळ दिले. त्यामुळे आजतागायत सामान्य जनतेचे हित लक्षात घेऊनच विकासकामे मार्गी लावलीत. शेतकरी किंवा जनतेला त्रास होईल असा एकही निर्णय आपण घेतला नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
निरा डाव्या कालव्यातून होत असलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर अस्तरीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. सरसकट अस्तरीकरण न करता गळती असेल तिथे अस्तरीकरण करण्यात येणार होते. मात्र जर लोकांचा विरोध असेल तर ते काम थांबवणे योग्य ठरेल. त्याचवेळी जिथे लोकांचा विरोध नसेल तिथे अस्तरीकरण करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.