बारामती : प्रतिनिधी
बजाज समूहाच्या माध्यमातून मागील आठवड्यात बारामतीत तब्बल १९ हजार जणांना लस देण्यात आली. त्यानंतर आता बारामती शहर आणि तालुक्यासाठी १५ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. मंगळवार दि. ७ सप्टेंबर रोजी हे लसीकरण पार पडणार आहे. त्यामुळे लस घ्यायची राहिलेल्या नागरीकांसाठी आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.
बारामतीसाठी आज मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाली आहे. तब्बल १५ हजार नागरीकांना लस देता येईल एवढा साठा उपलब्ध झाला असून उद्या (दि.७) शहर आणि तालुक्यातील केंद्रांवर हे लसीकरण केले जाईल, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
मागील आठवड्यात बजाज समूहाने जिल्हाभर महालसीकरण मोहिम राबवली होती. त्यामध्ये बारामती तालुक्यातील तब्बल १९ हजार नागरीकांना लसीकरणाचा लाभ मिळाला. त्यानंतर आता शासकीय पातळीवर १५ हजार लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लसीपासून वंचित असलेल्या नागरीकांना आणखी एक संधी चालून आली आहे.
नागरिकांनी शिस्तीचे पालन करत गर्दी न करता लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लस संपेपर्यंत लसीकरण चालू राहणार असल्याचेही कळवण्यात आले आहे.