Site icon Aapli Baramati News

अखेर माळेगावमधील ‘त्या’ घरफोडीची उकल; दोघा सख्ख्या भावांना अटक

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बंद फ्लॅटचे कुलूप तोडून १७ तोळे सोने आणि चांदीचा तब्बल साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यांच्याकडून तब्बल ९ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

युवराज अर्जुन ढोणे आणि अविनाश अर्जुन ढोणे (दोघेही रा. खेतमाळसवस्ती, मिरजगाव, ता. कर्जत, जि. नगर) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. याबाबत मिळालेले माहिती अशी की, २२ फेब्रुवारी रोजी माळेगाव येथील अमरसिंह कॉलनीत वास्तव्यास असलेल्या विनोद चांडवले यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाख ८३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला होता.

या घटनेनंतर पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तालुका पोलिसांना या घटनेचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांच्या पथकाने युवराज व अविनाश या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी या गुन्ह्याबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

माळेगाव येथून चोरून नेलेले दागिने नीलेश कुंदनमल झाडमूत्था (रा. डोंगरगण, ता. आष्टी, जि. बीड) याला विकल्याची कबुली या दोघांनी दिली. त्यानुसार हे दागिने जप्त करण्यात आले असून चोरीच्या पैशातून घेतलेला अॅपल मोबाईल आणि एक दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केली आहे. दरम्यान, हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर बारामतीसह सोलापूर, पुणे शहर, बार्शी, पंढरपूर, हडपसर, स्वारगेट आदी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version