Site icon Aapli Baramati News

एन्व्हॉर्यमेंटल फोरमचा वसुंधरा पुरस्कार यंदा नेहा पंचमिया यांना जाहीर

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती येथील एन्व्हार्यमेंटल फोरम  ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा वसुंधरा पुरस्कार यंदा वन्यजीव बचाव क्षेत्रातील कार्यकर्त्या नेहा पंचामिया यांना जाहीर झाला आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी म्हणजेच ५ जून रोजी बारामतीत होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली.

पर्यावरण, सामाजिक, विज्ञान, शिक्षण, आरोग्य तसेच अन्य विधायक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी वसुंधरा पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा वन्यजीव बचाव क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण काम करणाऱ्या नेहा पंचामिया यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. स्मृतीचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

दरम्यान बारामती मधील ज्या मान्यवरांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली आहे अशा काही मान्यवरांचा बारामती आयकॉन पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. गेल्या १३ वर्षांपासून एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया ही संस्था पर्यावरण संवर्धन व संरक्षण,  सामाजिक, विज्ञान, आरोग्य, शिक्षण यासारख्या क्षेत्रात कार्यरत आहे. दरवर्षी फोरमच्या  वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

यंदा शनिवारी (ता. ४) बारामती शहरातील सायली हिल परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे. याशिवाय पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. ५) सकाळी सहा वाजता पर्यावरण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात बारामतीसह भिगवण, इंदापूर, फलटण, श्रीपुर, माळशिरस या ठिकाणचे सायकल क्लबचे सदस्य सहभागी होणार आहेत.

त्याला जोडूनच सकाळी सात वाजता शारदा प्रांगण येथे मातीतील खेळांच्या जत्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली. हल्लीच्या मोबाइलच्या काळात मुले मातीतील खेळांपासून दुरावत चालली आहेत, त्याचा विचार करता दरवर्षी फोरमच्या वतीने पारंपारिक खेळांची माहिती मुलांना व्हावी या दृष्टीने या जत्रेचे आयोजन केले जाते.

यात गोट्या, विटी दांडू, लगोरी, टायर पळविणे, भोवरा, सूर पाट्या, रस्सीखेच, गजगे, फुगडी, लंगडी यासारख्या अनेक पारंपरिक खेळांचा समावेश असतो. या जत्रेचा समारोप झुम्बा या नृत्य प्रकाराने होणार आहे. या सर्व उपक्रमात बारामतीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version