बारामती : प्रतिनिधी
येत्या २ व ३ मार्च रोजी बारामती येथे आयोजित पुणे विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’त आत्तापर्यंत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील ३०० पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून त्यांच्याकडून विविध प्रकारची ४० हजार पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत, अशी माहिती कौशल्य विकास विभागाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत या मेळाव्याचे विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या पदांकरीता १० वी, १२ वी कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार, शिकाऊ उमेदवारी योजनेसाठी पात्र उमेदवार यांना संधी असणार आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करुन या संधीचा लाभ घ्यावा. महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी न झालेल्या उमेदवारांनाही प्रत्यक्ष मेळाव्याच्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.
या महारोजगार मेळाव्यात विविध विभागाच्या योजनांची, स्टार्टअप व विविध महामंडळे यांच्याद्वारे स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच मेळाव्यात अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थादेखील सहभागी होणार असल्याने कौशल्य प्रशिक्षणास इच्छुक उमेदवारांना याचा लाभ घेता येईल.
यावेळी उद्योग, करिअरच्या विविध संधी, शासकीय योजना आदी विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असेही श्रीमती पवार यांनी कळविले आहे.