बारामती : प्रतिनिधी
बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १५ जागांसाठी तब्बल २३५ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी दिली. दरम्यान, या निवडणुकीसाठी बँकेच्या विद्यमान संचालकांसह अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणाला संधी देतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक म्हणून बारामती बँकेचा नावलौकीक आहे. तब्बल ३६ शाखांचे जाळे असलेल्या या बँकेत जवळपास २२६० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तर १६ हजार ४५६ सभासद आहेत. या बँकेत संधी मिळावी यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. १५ जागांसाठी ही निवडणूक होत असल्याने त्यामध्ये कोणाला संधी द्यायची याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वसाधारण प्रभागासाठी १५८, महिला राखीव प्रवर्गासाठी १६, इतर मागास प्रवर्गातून २५, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात १७, भटक्या विमुक्त जाती प्रवर्गासाठी २६ अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी या अर्जांची छाननी होणार असून बुधवार दि. २४ नोव्हेंबर रोजी वैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर ८ डिसेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.