बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सोमेश्वरच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम कोरोनामुळे लांबणीवर पडला होता. या दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात सोमेश्वरच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निवडणूक कार्यक्रम जैसे थे ठेवण्यात आला.
आता नव्याने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यानुसार १२ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान मुदत देण्यात आली आहे. तर ५ ऑक्टोबर रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ६ ते १० ऑक्टोबर या दरम्यान अर्थात केवळ पाच दिवसच प्रचारासाठी मिळणार आहेत.
१२ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर दि. १४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर केला जाणार आहे.