Site icon Aapli Baramati News

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवा; कोरोना बाधितांवर तात्काळ उपचार करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी 

कोरोना विषाणूचा संसर्ग बारामती तालुक्यातही वाढत आहे. तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलन आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने, रुई रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. बारामती शहरासह ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे आवश्यक त्या आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. आरोग्य विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम करावे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version