आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणकृषि जगतपश्चिम महाराष्ट्रबारामतीमहाराष्ट्र

झारगडवाडीत खोडवा छाटणी व फोडणी यंत्राचे प्रात्यक्षिक

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

डोर्लेवाडी : वार्ताहर
बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील बारामती स्टील वर्क्समार्फत खोडवा फोडणी आणि खोडवा कटिंग करणारे आधुनिक पद्धतीचे नवीन अवजार तयार करण्यात आले आहे. या अवजाराच्या सहाय्याने ऊस खोडव्याची छाटणी तसेच खोडव्याची फोडणीदेखील करता येत असल्यामुळे एकाच अवजारात दोन्ही कामे केली जात आहेत. यांचे प्रात्यक्षित नुकतेच झारगडवाडी गावात दाखवण्यात आले.
शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करत आपल्या शेती मधील उत्पन्न वाढवले पाहिजे यासाठी गुरुवारी झारगडवाडीतील शेतकरी गोपीनाथ धनाजी बोरकर यांच्या शेतात या अवजाराच्या माध्यमातून ऊस खोडवा कटिंग व खोडवा फोडणी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी मोर्फाचे अध्यक्ष प्रल्हाद वरे, बारामती स्टील वर्क्स चे संचालक ज्ञानेश्वर सणस, अमोल पन्हाळे, शेतकरी विनोद शेळके, गणेश गोळे, हनुमंत झारगड, प्रवीण बोरकर, जनार्दन बोरकर, बाळासाहेब निकम, नागेश बोरकर आदी शेतकरी उपस्थित होते.
सध्या छत्रपती, माळेगांव, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या भागातील ऊस तोडणी सुरू आहे. ऊस तोडल्यानंतर अनेक शेतकरी खोडवा पीक घेत असतात. मात्र ऊस बुडापासून न तोडल्यामुळे ऊसाची उगवणी चांगल्या प्रकारे होत नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यासाठी तोडलेल्या उसाचे कटिंग योग्य प्रकारे होणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन हे अवजार तयार करण्यात आले असून त्याद्वारे ऊस खोडव्याची छाटणी करताना जमिनीबरोबर आणि बाजूची माती मोकळी होत असल्याने जमिनीत हवा खेळती राहत आहे. ऊस फुटवा देखील चांगल्या प्रकारे उगवून येतो. यामुळे या अवजार यंत्राचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचे बारामती मोर्फाचे अध्यक्ष प्रल्हाद वरे यांनी सांगितले.
चळी पाडणे, हरभरा, गहू, मका, बाजरी, ज्वारी, सोयाबीन हा सर्व पेरण्या एकाच अवजारात होतील अशा पद्धतीने अवजार यंत्र बनवण्यात आली आहे. या अवजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पैशाची बचत होणार आहे. ऊस खोडवा छाटणी आणि खोडवा फोडणी, रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर, बटाटा, हळद, पेरणी यंत्र देखील बनवण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून नवनवीन अवजाराच्या माध्यमाचा वापर करून आपल्या पैशाची आणि वेळेची बचत करावी असे बारामती स्टील वर्क्सचे संचालक ज्ञानेश्वर सणस आणि अमोल पन्हाळे यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण
Back to top button
Contact Us