
मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना यापूर्वी ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. मात्र अजूनही कोरोनाचे संकट संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने पुन्हा एकदा या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आज सहकार विभागाने ३१ ऑगस्टपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे.
राज्यातील अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका मागील वर्षापासून प्रलंबित आहेत. मागील वर्षीचे कोरोनाचे संकट अजूनही कमी होत नसल्याने सहकार विभागाकडून वारंवार मुदतवाढ देण्यात आली. यावर्षी या निवडणुका होवून नव्या लोकांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र कोरोनाने गेल्यावर्षीपेक्षा अधिक प्रमाणात रौद्ररूप धारण केल्याने पुन्हा एकदा या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
आज सहकार विभागाने काढलेल्या आदेशात ३१ ऑगस्टपर्यंत निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत तारीख पे तारीख अशीच अवस्था झाली आहे. परिणामी इच्छुकांचा हिरमोड होऊ लागला आहे.