Site icon Aapli Baramati News

CRIME NEWS : भरचौकात वाढदिवस साजरा करणं पडलं महागात; बारामती शहर पोलिसांनी केली कारवाई..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरातील सातव चौकात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणं चांगलंच महागात पडलं आहे. भर दुपारी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेल्या गर्दीवर बारामती शहर पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली आहे. तर संबंधित गुन्हेगारासह अन्य पळून जाण्यात यशस्वी झाले.

याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बारामती शहरातील सातव चौकात पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर दादासाहेब चांदगुडे याच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या ठिकाणी अनेक तरुण मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

या ठिकाणी राहुल राजेंद्र मदने (रा. प्रगतीनगर, बारामती), विकास नानासो चंदनशिवे (रा. मळद, बारामती),  अक्षय भीमराव कांबळे (रा. आमराई, बारामती) आणि सागर रमेश आटोळे (रा. कसबा, बारामती) यांना ताब्यात घेतले.  पोलिसांच्या कारवाईदरम्यान, संबंधित वाढदिवस असलेल्या सराईत गुन्हेगारासह अन्य तरुणांनी त्या ठिकाणाहून पळ काढला.या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी भादंवि कलम १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ आणि फौजदारी सुधारणा कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, भर रस्त्यावर वाढदिवस साजरा करणं टाळण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही याबाबत दक्षता घेऊन आपले शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या प्रकरांपासून दूर राहावं असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version