बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील गणेश भाजी मंडई परिसरात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर बारामती शहर पोलिसांनी कारवाई करत पीडित महिलांची सुटका केली. या महिलांना न्यायालयाच्या आदेशानुसार सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
बारामती येथील गणेश मार्केट समोर काही महिला वेश्या व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी बारामती शहर पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार बारामती शहर पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून मिळालेल्या माहितीची खात्री केली. त्यानंतर या ग्राहकाला संबंधित ठिकाणी पाठवून धाड टाकण्यात आली. त्यामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिला ताब्यात घेऊन त्यांच्यावर अनैतिक मानवी व्यापार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तीनही महिलांना न्यायालयाच्या आदेशानुसार सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जगदाळे, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, अभिजीत कांबळे, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण, कोठे, सचिन कोकणे, दशरथ इंगोले, मनोज पवार यांनी ही कारवाई केली.