
बारामती : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला वारसा हक्कसोड नोंद करून घेण्यासाठी अठरा हजारांची लाच मागणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बारामतीत रंगेहाथ पकडले. प्रवीण सुखदेव भगत असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई तलाठ्याचे नाव आहे.
कुरवली येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या प्रविण भगत याने एका प्रकरणात वारसा हक्कसोड नोंद करून घेण्यासाठी तक्रारदाराकडे पैशाची मागणी केली होती. आधी १८ हजारांची मागणी केली होती, तडजोड करून शेवटी १२ हजारांत हा सौदा ठरला होता. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची शहानिशा करुन सापळा रचला.
सोमवारी रात्री बारामती शहरातील इंदापूर रस्त्यावर एका रुग्णालयानजीक भगत हा राहत असलेल्या घराजवळ ही लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. या संदर्भात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.