Site icon Aapli Baramati News

Crime News : अपघातग्रस्त कंटेनर पोलिस ठाण्यात आणला; अन २२ लाखांचा गुटखा जप्त झाला..!

ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर शहरानजीक अपघातग्रस्त कंटेनरमध्ये इंदापूर पोलीसांना सुमारे २२ लाख २७  हजार ५०० रुपये किमतीचा गुटखा मिळून आला आहे. इंदापूर पोलिसांनी या गुटख्यासह २५ लाख रुपये किंमतीचे एक सहा चाकी वाहन असा एकूण ४७ लाख २७  हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यासंदर्भात इंदापूर पोलिस ठाण्यात पोलीस शिपाई सुहास सिंकदर आरणे यांच्या फिर्यादीवरुन हनीफ सय्यद (रा. बेंगलोर) याच्यासह  कंटेनर (क्र. केए ०१ एएफ ३३९६) च्या मालकाविरुध्द इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी दि. ९ जानेवारी रोजी पहाटे इंदापूर येथील हाॅटेल देशपांडे व्हेजच्या समोर एका कंटेनरची उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसून अपघात झाला होता. याची इंदापूर पोलिसांना मिळताच इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. 

जखमी वाहन चालकाला उपचार कामी रुग्णालयात दाखल करुन अपघातात नुकसान झालेला कंटेनर क्रेनच्या सहाय्याने इंदापूर पोलीस ठाण्यात आणला गेला.  त्यानंतर त्या कंटेनरमध्ये कोणता माल आहे,काही संशयास्पद तर नाही ना..? याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्रात विक्रीस व वाहतूकीस बंदी असलेला सुमारे २२ लाख रुपये किमतीचा आर.के.प्रिमीयम कंपनीचा गुटखा असलेली ४५ पोती मिळून आली. 

पोलिसांनी अधिक चौकशी करत या गुटख्यासह २५  लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण ४७ लाख २७ हजार ५००  रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश माने करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version