बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पारवडी गावाच्या हद्दीत शिपकुलेवस्ती येथे स्वतः च्या मुलाच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीचा ठावठिकाणा शोधत बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या तीन तासात अटक केली.
मारुती साधुराम जाधव असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारवडी गावातील शिपकुलेवस्ती येथे घरगुती कारणावरून झालेल्या भांडणातून मारुती जाधव याने स्वतःच्या मुलाच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तातडीने सूत्रे हलवली.
या घटनेतील आरोपीकडे मोबाईल नसल्याने आणि त्याचे छायाचित्रही उपलब्ध नसल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे आव्हान होते. मात्र अधिक चौकशी करत पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला १५ किमी परिसरात शोध मोहीम राबवली. मारुती जाधव हा वनविभागात लपून बसल्याचे पोलिसांना आढळले. झाडीत लपलेल्या मारुती जाधवला पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार राहुल पांढरे, नंदू जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे यांच्या पथकाने केली.