Site icon Aapli Baramati News

Crime News : बारामतीत एक लाख रुपयांची लाच घेताना पोलिस हवालदार जाळ्यात

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

एका मारहाणीच्या प्रकरणात नाव न येण्यासाठी १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार दादासाहेब ठोंबरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. रविवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, यापूर्वीही ठोंबरे याच्यावर लाच स्वीकारताना कारवाई झाली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  एका मारहाणीच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होवू नये यासाठी मदत करतो म्हणून दादासाहेब ठोंबरे याने १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत संबंधित तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून ठोंबरे यांच्या कारनाम्याचा भांडाफोड केला.

या तक्रारदाराचे एका मारहाणीच्या गुन्ह्यात नाव न घेण्यासाठी आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी ठोंबरे याने १ लाख ८० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती संबंधित तक्रारदाराने १ लाख १० हजार रुपये देण्याचे कबूल केले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही लाच स्वीकारताना पोलिस हवालदार ठोंबरे याला रंगेहाथ पकडले.  

दरम्यान, बारामती शहर पोलिस ठाण्यात नेमाणुकीस असतानाही हवालदार ठोंबरे याच्यावर लाच घेताना कारवाई झाली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा त्याच्यावर ही कारवाई झाली आहे. नेमणूक मिळेल तिथे मलिदा लाटण्यात माहिर असलेल्या ठोंबरे याच्या कारनाम्याची पोलिस दलात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता वरिष्ठांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून हवालदार ठोंबरे याच्या कृत्यांना चाप लावण्याची गरज व्यक्त होत आहे.    


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version