बारामती : प्रतिनिधी
शरीर पिळदार बनवण्यासाठी इंजेक्शनची विक्री करणाऱ्या बारामती कसबा परिसरातील प्रदीप सुरेश सातव याच्यावर बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून २० इंजेक्शन बाटल्यांसह साडेनऊ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेत त्याच्यावर भादंवि कलम १७५,२७६,३२८,३३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजकाल तरूण पिढीमध्ये शरीर बनवण्याचे वेढ वाढलेले आहे त्यासाठी काहीही करावयाची त्यांची तयारी आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंट घेणे, काही इंजेक्शन घेणे यासारखे प्रकार केले जातात.परंतु त्याचा दुष्परिणाम हा शरीरावर होत असतो. चित्रपट व मालिकांमधील अभिनेत्यांसारखे शरीर बनवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्यामुळे शरीराची खुप मोठया प्रमाणावर हानी होत आहे. त्यातूनच काही शरीरसौष्ठवपटूंना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
शरीर बनवण्यासाठी इंजेक्शन आणि अमली पदार्थ घेण्याचे लोन आता ग्रामीण भागातही पसरत आहे. बारामतीतील प्रदीप सातव हा जीम चालक लोकांना शरीर पिळदार होते असे सांगून इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून क्रेटा कारसह (क्र. एम.एच.०२ डी.झेड.७२८६) ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून २० इंजेक्शन हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलिसांनी जप्त केलेले इंजेक्शन हे सर्जरी केलेनंतर रक्त पुरवठा नियंत्रित करण्यासाठी व दुखवटा कमी करण्यासाठी वापरले जाते. मात्र या इंजेक्शनचा वापर जास्त शारीरिक परिश्रम झाल्यानंतर सुस्ती येवू नये यासाठी केला जाऊ लागला आहे. ही बाब शारीरिकदृष्ट्या धोकादायक आहे.
हे इंजेक्शन कोठून आणली व अजून कुठे विकली आहेत याचाही आता शोध घेतला जात आहे. शरीर नैसर्गिकरित्या कमवा कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन किंवा सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका असे आवाहन बारामती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक यांनी केले आहे.
पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, अभिजित कांबळे, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, कर्मचारी बंडू कोठे, अजित राऊत, दशरथ इंगोले, सचिन कोकणे, मनोज पवार यांनी ही कारवाई केली.