बारामती : प्रतिनिधी
प्रेम प्रकरणात अडथळा निर्माण करत असल्याच्या संशयातून बारामती शहरात भरदिवसा मित्रांनीच एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार आज घडला. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
शेखर शशिकांत कारंडे असे या घटनेतील जखमी मुलाचे नाव आहे. आज दुपारी शेखर हा त्याच्या मित्रासमवेत भिगवण रस्त्यावरील एका सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेला होता. त्यावेळी गणेश वाघमोडे, यश पवार आणि अन्य एकाने प्रेम प्रकरणात येत असल्याच्या संशयातून शेखरवर कोयत्याने वार केले.
या घटनेत शेखर कारंडे याच्या डोक्याला आणि पाठीला जबर जखम झाली आहे. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी गणेश वाघमोडे, यश पवार आणि त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी घटनास्थळी भेट देत जखमीचीही माहिती घेतली.
दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत असून तेही अल्पवयीन असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस हवालदार जगताप हे अधिक तपास करीत आहेत.