बारामती : प्रतिनिधी
सोशल मिडीयाच्या दुनियेत कधी कुणाशी ओळख होईल आणि कधी कुणाची फसवणुक होईल हे सांगता येत नाही.. असाच एक प्रकार बारामतीत घडला आहे. इन्स्टाग्रामवरुन ओळख झालेल्या मुलीशी लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंध प्रस्थापित करुन नंतर त्या मुलीला धमकावल्याप्रकरणी झारगडवाडी येथील एकावर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश गुलाब मासाळ (वय २२, रा. झारगडवाडी, ता. बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अविनाश मासाळ हा बारामती एमआयडीसीतील कंपनीत काम करतो.
नऊ महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्याची फलटण येथील एका २० वर्षीय युवतीशी ओळख झाली. त्यातून त्यांचा सातत्यानं संवाद होवू लागला. या दरम्यान त्यांच्या भेटीही झाल्या. या भेटीदरम्यान, दोघांमध्ये शारीरीक संबंधही प्रस्थापित झाले. मला तुझ्याशी लग्न करायचे असल्याचे हा युवक या पिडीतेला सांगत होता.
काही दिवसांपूर्वी या पिडीतेने लग्नाचा विषय काढला. त्यावेळी या युवकाने तिला लग्नास नकार देत धमकावले. मला लग्न करायला जमणार नाही असे सांगत तो या पिडीतेला सातत्याने धमकी देत होता. त्यामुळे या पिडीतेने बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीनुसार बारामती शहर पोलिसांनी अविनाश मासाळ याच्यावर भादंवि कलम ३७६ व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पालवे हे करत आहेत.