Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : ‘घाव मेरा गहेरा है, अगला नंबर तेरा है’ हे स्टेटस चर्चेत; दहशत निर्माण करण्यासाठी कट रचत केला शशिकांत कारंडेंचा खून..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : विशेष प्रतिनिधी

प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या मुलावर असलेल्या संशयातून शशिकांत कारंडे यांचा भरदिवसा खून झाला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून हे तिघेही अल्पवयीन आहेत. केवळ काहीतरी करून दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून कारंडे यांचा खून केल्याची माहिती पुढे आली आहे. या तिघांनीही अतिशय थंड डोक्याने कट रचत हा खून केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

काल गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शशिकांत कारंडे हे आपल्या मुलीला आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर तिघांनी कोयत्याने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर बारामती शहरात एकच खळबळ उडाली आहे. आज या आरोपींना बारामती शहर पोलिसांनी अटक केली असून काहीतरी घडवून दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नातून हा खून झाल्याचेही आता तपासात समोर आले आहे.

१३ मे २०२२ रोजी शशिकांत कारंडे यांचा मुलगा शेखर याच्यावर याच आरोपींनी हल्ला केला होता. शेखर हा आपल्या प्रेमात अडथळा ठरत असल्याच्या संशयातून हा हल्ला करण्यात आला होता. विशेष म्हणजे, आरोपी आणि शेखर हे मित्र होते. मात्र या हल्ल्यानंतर कारंडे यांनी शेखरला पुढे करत बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तसेच या सर्वांना एकत्रित बसवून वाद न करण्याबाबतही समजावले होते. त्यामुळे आरोपींचा शशिकांत कारंडे यांच्यावर राग होता. याच प्रकरणात त्यांना काही दिवस बाल न्यायालयातही राहावे लागले होते. मात्र त्यांच्या पालकांनी नंतर त्यांना सोडवून आणले.

शेखरवरील हल्ल्याच्या प्रकरणातून सुटल्यानंतर या अल्पवयीन आरोपींनी नवीन प्लॅन आखायला सुरुवात केली. काहीतरी मोठे घडवायचे आणि आपली दहशत निर्माण करायची एवढीच या आरोपींची मानसिकता होती. त्यातच कालच्या घटनेपूर्वी आरोपींपैकी एकाने ‘घाव मेरा गहेरा है, अगला नंबर तेरा है’ असं स्टेटस ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या तिघांनीही अतिशय थंड डोक्याने नियोजन करत शशिकांत कारंडे यांच्या खूनाचा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.

अलीकडील काळात सोशल मिडियाचा वापर वाढला आहे. त्यातूनच अल्पवयीन मुलांमध्ये ‘फेमस’ व्हायची फॅशन रूढ होत आहे. काल बारामतीत झालेली घटना ही याचाच परिपाक असल्याचे बोलले जात आहे. केवळ आपली दहशत निर्माण व्हावी यासाठी एकेकाळच्या सख्ख्या मित्रावर प्राणघातक हल्ला आणि त्यानंतर थेट त्याच्या वडिलांच्या खूनापर्यंत मजल गेल्याचे स्पष्ट झाले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version