Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : कुऱ्हाडीने वार करत केला सख्ख्या भावाचा खून; बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना

Police line do not cross

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

शेतात लाकडी ओंडके आडवे टाकल्याच्या वादातून कुऱ्हाडीने वार करत सख्ख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील मोढवे येथे घडली. शुक्रवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तायाप्पा सोमा मोटे असे या घटनेतील मृत पावलेल्या भावाचे नाव आहे. याबाबत त्यांची सून लक्ष्मी महादेव मोटे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी रामा सोमा मोटे याने शेतात जाण्याच्या रस्त्यावर लाकडी ओंडके आडवे टाकले होते.शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मयत तायाप्पा मोटे हे शेताकडे जाताना त्यांना ही बाब निदर्शनास आली.

त्यांनी याबाबत आपल्या भावाला विचारणा केली. त्यावर रामा मोटे याने तू इकडून जायचे नाहीस, तुला आता खल्लासच करतो असे म्हणत तायाप्पाच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेत ती तायाप्पांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला.  या प्रयत्नात कुऱ्हाडीचा घाव त्यांच्या पायावर बसला. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन तायाप्पा मोटे यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी लक्ष्मी मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामा सोमा मोटे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version