बारामती : प्रतिनिधी
मुलाचं अपहरण करून त्याला जीवे मारण्याची धमकी देत एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगार रोहित केशव जगताप याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ या आरोपीला अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रोहित जगताप याने आपल्या दहशतीच्या जोरावर आणि मुलाचं अपहरण करून त्याला जीवे मारण्याची धमकी देत काल दुपारी बारामतीतील एका असहाय्य महिलेला मोरगाव रस्त्यावरील सिकंदरनगर भागात झुडपात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर ही महिला ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी जाऊन गोंधळ घालत पुन्हा तिला शारीरिक संबंधांसाठी मागणी घातली.
या महिलेने त्याला नकार दिल्यानंतर या आरोपीने तिच्या घरी जाऊन गोंधळ घालत तोडफोड केली. या प्रकारानंतर संबंधित महिलेने बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शहर पोलिसांनी रोहित केशव जगताप याच्यावर कलम ३७६, ४२७, ५०६, ५०४ नुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अधिक तपास बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, पोलिस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके करीत आहेत.