बारामती : प्रतिनिधी
बारामतीत कार्यरत असलेल्या एका मुजोर पोलिस उपनिरीक्षकाने तक्रारदार महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्या पतीला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित पतीने पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान, संबंधित पोलिस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश पोलिस अधिक्षकांकडून देण्यात आले आहेत.
बारामती तालुक्यातील एका महिलेने कौटुंबिक वादातून विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेचा तपास बारामतीत कार्यरत असलेल्या या पोलिस उपनिरीक्षकाकडे देण्यात आला होता. त्याने तक्रारदार महिलेच्या नंबरवर लगट साधत तिच्याशी जवळीक साधली.
सातत्याने या महिलेच्या संपर्कात राहून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती स्पर्धा परिक्षेची तयारी करत असल्याचे समजल्यानंतर तिला पुण्यात राहण्यास प्रवृत्त करत लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिले. त्यामुळे ही महिला आपल्या दोन मुलींना सोडून पुण्यात वास्तव्यास गेली. त्यानंतर तिने हळूहळू आपल्या कुटुंबियांशी संपर्क कमी केला.
याच दरम्यान, संबंधित महिलेच्या हातावर या पोलिस अधिकाऱ्याच्या नावाचा टॅटू पतीला आढळला. त्यावरून दोघा पती-पत्नीत वादही झाला. ही बाब समजल्यानंतर या मुजोर पोलिस अधिकाऱ्याने या महिलेच्या पतीलाच धमकावले. तिला काही बोलला तर हात पाय तोडीन, तिला त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे अशीही धमकी दिली.
या सर्व प्रकारानंतर संबंधित महिलेच्या पतीने आपल्या कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. डॉ. देशमुख यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या पोलिस उपनिरीक्षकाचे अनेक कारनामे असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. आपल्या वर्दीचा गैरफायदा घेवून अनेकांना या अधिकाऱ्याने त्रास दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई होणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.