बारामती : प्रतिनिधी
एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीला बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. नाव, पत्ता माहिती नसताना केवळ हातावरील टॅटूच्या सहाय्याने पोलिसांनी या आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे.
सलीम उर्फ सागर इक्बाल मुश्रीफ (वय २५, रा.गोजुबावी, सध्या रा.लक्ष्मीनगर,बारामती) असे बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि:२५ नोव्हेंबर रोजी बारामती शहरातील अमराईमध्ये राहणारी एक अल्पवयीन मुलगी साडेचार महिन्यांची गरोदर असल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती बारामती शहर पोलिसांना देण्यात आली.
त्यानुसार बारामती शहर पोलिसांच्या पथकाने ससुन रुग्णालयात संबंधित पीडित आणि तिच्या आईचा जबाब नोंदवला. संबंधित पिडीत मुलगी मोरगाव रस्त्याकडे शाळेत जात असताना तिची एका मुलाबरोबर ओळख झाली. त्यातून ते दोघे एकमेकांना भेटत राहिले आणि त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली.
समाजात बदनामी होईल या भीतीमुळे पीडितेला तिच्या आईने ससून रुग्णालयात दाखल केल्याचे जबाबात समोर आले. त्यानुसार बारामती शहर पोलिसांनी बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपीचा नाव पत्ता माहिती नसताना पीडितेने दिलेल्या वर्णनावरून आणि हातावरील टॅटुवरुन या आरोपीला शोधणे हे पोलिसांसमोर आव्हान होते.
पोलिसांनी गोपनीय पद्धतीने या वर्णनाच्या मुलाचा शोध घेतला. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली असून त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, उपनिरीक्षक वाघमोडे, तुषार चव्हाण, मनोज पवार, दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, बंडू कोठे यांनी ही यशस्वी कामगिरी केली.