बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुढाळे येथील जिल्हा प्राथमिक शाळेतून संगणक स्क्रीन आणि शालेय पोषण आहाराची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
राजेंद्र मारुती जाधव (रा. ढाकाळे, ता. बारामती), लक्ष्मण मल्हारी सकाटे व राहुल वसंत कोकाटे ( दोघेही रा. मुढाळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान, या पथकाला मुढाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून संगणक स्क्रीन आणि शालेय पोषण आहाराची राजेंद्र जाधव याने चोरी केल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार या पथकाने राजेंद्र जाधव याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार या तिघांनाही अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या संगणक स्क्रिन, शालेय पोषण आहाराची भांडी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप येळे, पोलीस हवालदार रविराज कोकरे, आसिफ शेख, अभिजित एकशिंगे, पोलीस नाईक स्वप्निल अहिवळे यांनी ही कारवाई केली.