बारामती :बारामती शहर आणि तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत दर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
बारामतीत दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. त्यामध्ये परिसरातील शेतकरी, ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला ठोस उपाययोजना राबावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बारामती नगरपरिषदेच्या वतीने शहरात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. शहरातील विविध भागात नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी जाऊन आजारी व्यक्तींची माहिती घेत आहेत.
शहरात सर्वेक्षण सुरू असले तरी अधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याने आज प्रशासनाकडून आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना आटोक्यात येईपर्यंत हा आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी कळवले आहे.