बारामती : प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पुणे-मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. अशातच आता बारामतीतही कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचे समोर आले आहे. आज बारामतीत कोरोनाचे तब्बल १५ रुग्ण आढळून आले आहेत. मागील काही दिवसात बारामतीत कोरोना रुग्णांचे प्रमाण नगण्य होते.
देशासह राज्यात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. पुणे, मुंबईसह अन्य भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यात अनेक निर्बंध लागू केले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात पहिली ते आठवीपर्यंत शाळाही बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अशातच आता बारामतीतही कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
बारामतीत आज तब्बल १५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. काल शासकीय प्रयोगशाळेत १५७ आणि खासगी प्रयोगशाळेत २६ अशा एकूण १८३ नमुने तपासण्यात आले. तर ३४४ जणांची अॅंटीजन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील १२ रुग्ण बारामती शहरातील असून ३ रुग्ण बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत.
बारामतीत मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांचे प्रमाण नगण्य होते. मात्र आज अचानक १५ जण कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता बारामतीकरांनी अधिकची काळजी घेण्याची आवश्यकता असून कोरोना नियमांचे पालन करण्यासह लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.