पुणे : प्रतिनिधी
गेल्यावर्षी केंद्र शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रात सद्यस्थितीत गर्दी टाळली जावी या उद्देशाने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासाठी जे निर्बंध आहेत त्याचे पालन नागरिकांकडून होताना दिसत नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर नाईलाजास्तव कठोर निर्बंध करावे लागतील असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
आज पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना नागरिकांनी सद्यस्थितीत नियमांचे पालन करून शासनाला सहकार्याची भूमिका ठेवावी असे आवाहन केले आहे. गत वर्षी कोरोनाची पहिली लाट असताना लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. आता दुसरी लाट गेल्यावर्षीपेक्षा भयंकर आहे. त्यामुळे राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. परंतु नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र दिसत असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.
वास्तविक नागरिकांना लॉकडाऊनमुळे त्रास होवू नये यासाठी काही सेवा शिथिल करण्यात आल्या आहेत. मात्र त्याचे गांभीर्य न राखता नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होणार असेल तर कठोर निर्बंध लादणे हाच पर्याय असल्याचे स्पष्ट करून अजित पवार यांनी नागरिकांनी शासनाला सहकार्याची भूमिका ठेवली तरच पुढील संकटाला तोंड देता येणार असल्याचे सांगितले.