बारामती : प्रतिनिधी
पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बारामती तालुक्यातून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आणि माजी संचालक दत्तात्रय येळे या दोघांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामतीतून या दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीसाठी २२ डिसेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. तत्पूर्वीच आज राष्ट्रवादीकडून इतर मागास प्रवर्गातून संभाजी होळकर यांना आणि भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून दत्तात्रय येळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज पुण्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत जिल्हा बँकेच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
संभाजी होळकर हे सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेसची बारामती तालुकाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य सभापती, होळ गावाचे सरपंच, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्षपद यासह अनेक पदांवर काम केले आहे. प्रशासकीय योजना, शैक्षणिक कार्य यासह सर्वसामान्यांशी संपर्कात असलेल्या संभाजी होळकर यांना पक्षाने संधी दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.
दत्तात्रय येळे यांनीही यापूर्वी जिल्हा बँकेच्या संचालकपदी काम केले आहे. शंकर नागरी पतसंस्थेचे संस्थापक, माळेगाव कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे.
दरम्यान, बारामती तालुक्यातून अ वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. अजित पवार यांच्यासह आणखी दोन प्रतिनिधी बारामती तालुक्यातून निवडून जाणार आहेत. त्यामुळे बारामती तालुक्यातून एकूण तीन संचालक जिल्हा बँकेवर असतील.