बारामती : प्रतिनिधी
गोबरगॅस टाकीची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या युवकासह त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य तिघांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यातील खांडज येथे घडली. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे बारामती तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
या दुर्दैवी घटनेत प्रकाश सोपान आटोळे, प्रवीण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे व बापूराव लहूजी गव्हाणे या चौघांचा मृत्यू झाला आहे. बारामती तालुक्यातील खांडज गावच्या हद्दीत २२ फाट्याजवळ ही घटना घडली. याबाबत माहिती अशी की, आटोळे यांच्या शेतात इंग्रजकालीन टाकी होती. या टाकीलाच गोबरगॅससाठी वापरण्यात येत होते.
या टाकीची स्वच्छता करण्यासाठी एकजण गेलेला असताना तो टाकीत अडकला. त्याला वाचवण्यासाठी अन्य तिघेजण गेले. मात्र तेही या टाकीत अडकले. या चौघांचाही टाकीत गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर या चौघांनाही बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. माळेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सुत्रे हलवली. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.