बारामती : प्रतिनिधी
बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना काल रात्री घडली आहे. यातील जखमी रणजीत निंबाळकर यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी गौतम काकडे, गौरव काकडे यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आले आहे.
बारामती तालुक्यातील निंबूत येथील गौतम काकडे हे बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच त्यांनी सुंदर हा नावाजलेला बैल फलटण येथील रणजीत निंबाळकर यांच्याकडून खरेदी केला होता. त्यापोटी गौतम काकडे यांनी ५ लाख रुपये निंबाळकर यांना दिले होते व उर्वरीत ३२ लाख रुपये नंतर देण्याचे ठरवण्यात आले होते. त्यातूनच काल रणजीत निंबाळकर यांनी आपल्या पत्नी व मित्रांसमवेत निंबूत येथे गौतम काकडे यांच्या घरी येत व्यवहार पूर्ण करण्यास सांगितले.
तुम्ही मी पैसे देत नाही असे कोणालाही बोलायला नको होते असं म्हणत गौतम काकडे यांनी संबंधित कागदपत्रांवर सह्या करा, तुम्हाला उद्या सकाळीच पैसे मिळतील असं उत्तर रणजीत निंबाळकर यांना दिलं. मात्र रणजीत निंबाळकर यांनी तुम्ही मला आता पैसे द्या मी लगेच सह्या करतो. अन्यथा मी विसार म्हणून घेतलेली रक्कम परत करत बैल घेऊन जातो अशी भूमिका घेतली. त्यातूनच या दोघांमध्ये वादाला सुरुवात बोलले जात आहे.
हा वाद सुरू असतानाच गौतम काकडे यांनी त्यांचे भाऊ गौरव काकडे व अन्य मुलांना बोलावून घेतले. त्यांनी रणजीत निंबाळकर यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यावेळी वैभव कदम यांनी गौतम काकडे यांना अडवत या व्यवहारावर उद्या चर्चा करू असे सांगत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, त्या ठिकाणी आलेल्या गौरव यांनी तू बैल कसा नेतो तेच बघतो, तुला जीवंतच ठेवत नाही असं म्हणत त्यांच्याकडील पिस्तुलातून रणजीत निंबाळकर यांच्या डोक्यात एक गोळी झाडली. त्यानंतर रणजीत निंबाळकर हे खाली कोसळून पडले असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर रणजीत निंबाळकर यांना सुरुवातीला बारामतीतील रुग्णालयात नेण्यात आले. तेथून तातडीच्या उपचारांसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गौतम काकडे, गौरव काकडे, शहाजीराव काकडे यांच्यासह अन्य तिघांवर भादंवि कलम ३०७, १४३,१४७,१४९,५०४,५०६,३५२, शस्त्र अधिनियम क ३/२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.